प्रा. सचिन पुजारी यांना प्राना फाऊंडेशनचा प्रतिष्ठेचा शैक्षणिक पुरस्कार

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; ढेबेवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित



तळमावले |कृष्णाकाठ वृत्तसेवा : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत प्राना फाऊंडेशन, ढेबेवाडी यांच्या वतीने काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील कनिष्ठ विभागात कार्यरत असलेले प्रा. सचिन पुजारी यांना सन २०२६ चा शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी ढेबेवाडी, ता. पाटण येथे आयोजित समारंभात सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

‘वारसा समाजकार्याचा’ या प्रेरणादायी संकल्पनेतून प्राना फाऊंडेशनतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. या उपक्रमांतर्गत प्रा. सचिन पुजारी यांची शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत योगदान देतानाच सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या प्रा. पुजारी यांच्या कार्याचा या पुरस्काराद्वारे गौरव करण्यात आला.

प्रा. पुजारी हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथे कनिष्ठ विभागात कार्यरत आहेत. यासोबतच ते कुंभारगाव येथील संजीवन प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधत कार्यरत असलेल्या त्यांच्या योगदानाला या सन्मानामुळे विशेष अधोरेखित करण्यात आले आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील (नाना), महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सदस्य सत्यजितसिंह पाटणकर (दादा), सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हिंदुराव पाटील (बापू), प्राना फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. प्राचीताई पाटील, भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव कविताताई कचरे, भाजपाचे पाटण तालुका मंडळ अध्यक्ष गणेश यादव यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच वांग खोऱ्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवर आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रा. सचिन पुजारी यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, माजी सहसचिव (अर्थ) एस. के. कुंभार, माजी सहसचिव (प्रशासन) आर. के. भोसले, काकासाहेब चव्हाण कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या प्रो. डॉ. उषादेवी साळुंखे तसेच सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती संजय देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शैक्षणिक कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान प्रा. सचिन पुजारी यांच्या कार्याला नवी प्रेरणा देणारा ठरला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सहकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.