लॉकरमधील व्यवहारानंतर नजरचुकीने शाखेतच राहिलेले किमती सुवर्णालंकार ग्राहकाला सुरक्षितपणे परत करून आदर्श पतसंस्थेचे शाखाप्रमुख सचिन ढोणे यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कृतीबद्दल प्रभावित झालेल्या ग्राहकाने त्यांना १० हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
आदर्श पतसंस्थेचे सभासद व माजी उपसरपंच सचिन पाचुपते हे काही दिवसांपूर्वी पतसंस्थेच्या शाखेत लॉकरचा व्यवहार करण्यासाठी आले होते. व्यवहार पूर्ण करून ते घरी गेल्यानंतर त्यांचे किमती सुवर्णालंकार लॉकरबाहेरच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.
दरम्यान, सुमारे २० मिनिटांनी शाखाप्रमुख सचिन ढोणे यांच्या निदर्शनास हे सुवर्णालंकार आले. कोणताही विलंब न करता त्यांनी सचिन पाचुपते यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सचिन पाचुपते तातडीने शाखेत परतले आणि आपले सुवर्णालंकार सुरक्षित असल्याचे पाहून त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
आपली मौल्यवान वस्तू कोणतीही अपेक्षा न ठेवता परत केल्याबद्दल सचिन पाचुपते यांनी ढोणे यांचे मनापासून आभार मानले. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांनी ढोणे यांना १० हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन सन्मानित केले.
या प्रसंगाचा गौरव संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राजू मुल्ला, उपाध्यक्ष हणमंत जाधव, तारांगणचे संस्थापक आनंदराव शिंदे, माजी अध्यक्ष विनायक यादव, लेखापरीक्षक के. एल. सावंत यांच्यासह संचालक, शाखाप्रमुख, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
