महाराष्ट्रातील अग्रगण्य वित्तीय संस्था म्हणून नावाजलेल्या ‘शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., तळमावले’ चा वर्धापनदिन सोहळा शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष ॲड.जनार्दन बोत्रे यांनी दिली. शनिवारी सकाळी मुख्य कार्यालयात श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून सर्व सभासद, ठेवीदार आणि नागरिकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
वर्धापनदिनाचे औचित्य साधून संस्थेने ठेवीदारांसाठी विशेष सुवर्णसंधी जाहीर केली आहे. दि.१५ ऑगस्ट ते दि.१५ सप्टेंबर, २०२६ या एक महिन्याच्या कालावधीत संस्थेत ठेवण्यात येणाऱ्या मुदत ठेवींवर नेहमीपेक्षा १ टक्के जादा व्याजदर दिला जाणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सामाजिक उपक्रमांतर्गत शिवसमर्थ मल्टिस्टेट आणि बालाजी ब्लड सेंटर, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याची रक्ताची गरज लक्षात घेता तरुणांनी व नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. याशिवाय, शिव आरोग्य सेवा मल्टि स्पेशालिटी को-ऑप. हॉस्पिटल ॲंड रिसर्च सेंटर लि. यांच्या सहकार्याने 'शिव आरोग्य सेवा हॉस्पिटल, तळमावले' येथे शनिवारी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी व सल्ला दिला जाणार असून, या सर्व सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक ॲड.जनार्दन बोत्रे यांनी केले आहे.
