कोल्हापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा : शिक्षणमहर्षी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंत (डी. वाय.) पाटील यांचे आज (४ ऑगस्ट) सकाळी कोल्हापुरातील निवासस्थानी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, एका प्रेरणादायी पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कोरोना काळानंतर डॉ. पाटील हे कोल्हापुरातील 'यशवंत निवास' येथे वास्तव्यास होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. घरच्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुमारे वीस दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातून ते सावरत असतानाच ३ ऑगस्टपासून प्रकृतीत अधिक बिघाड झाला आणि आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. पाटील यांचे पार्थिव उद्या, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कसबा बावडा येथील 'यशवंत निवास' येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता अंत्ययात्रा निघणार असून, सायंकाळी ५ वाजता डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार (कसबा बावडा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप येथे जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा ध्यास आयुष्यभर जपला. १९८३ मध्ये नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात नवे पर्व सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे डीम्ड विद्यापीठांसह १८० हून अधिक शैक्षणिक संस्था कार्यरत असून, लाखो विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत.
त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. संजय डी. वाय. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, मुलगी डॉ. नंदिता पालशेतकर, नातू ऋतुराज पाटील यांच्यासह मोठा परिवार आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून, विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
