पावसाने ढेबेवाडी विभागाला झोडपले; आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावल्या जि. प. सदस्या मृणाल पाटील

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू



ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागाला गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाली असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर उद्योजक महेश पाटील व जिल्हा परिषद सदस्या मृणाल पाटील यांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून आपत्तीग्रस्त कुटुंबांना हेल्पिंग किटचे वाटप केले.
ढेबेवाडी विभागातील वरपेवाडी, एकवडेवाडी तसेच परिसरातील पावसामुळे बाधित झालेल्या कुटुंबांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना आवश्यक मदत देण्यात आली. शासनाकडून मदत पोहोचण्यापूर्वीच मृणाल पाटील यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबांना धीर देत तातडीची मदत उपलब्ध करून दिली.
ढेबेवाडी जिल्हा परिषद गटात अद्यापही पावसाची संततधार सुरू असून अनेक ठिकाणी नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून लोकप्रतिनिधीही प्रशासनाच्या समन्वयाने मदतकार्यात सक्रिय सहभागी झाले आहेत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या मृणाल पाटील म्हणाल्या, "पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली हे मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून आपत्तीग्रस्त कुटुंबांना धीर देणे आणि त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे हे आमचे प्राधान्य आहे. भागातील लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत मी सदैव त्यांच्या सोबत राहणार आहे."