ढेबेवाडीत जनजागृती कार्यक्रम; सायबर फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन.
ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सातारा जिल्हा पोलीस दलाच्या भरोसा सेलतर्फे गुरुवारी (दि. २) ढेबेवाडी येथे विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि कायदेशीर अधिकारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मा. पोलीस अधीक्षक, सातारा जिल्हा तसेच मा. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ढेबेवाडी पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. त्यांच्या दैनंदिन जीवनातील घरगुती व सामाजिक अडचणी जाणून घेत त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर बँक खात्याशी संबंधित ओटीपी, एटीएमचा पिन, पासवर्ड किंवा अन्य गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, अनोळखी व्यक्तींच्या आमिषांना बळी पडू नये आणि कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांनी कोणतीही अडचण, भीती किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यास तातडीने ११२ किंवा १०९१ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही यावेळी सांगण्यात आले. प्रवासादरम्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणी त्रास देत असल्यास अथवा अपमानास्पद वर्तन करत असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रत्येक नागरिकाला कायदेशीर अधिकार असल्याची माहिती देण्यात आली. प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात भरोसा सेल, सातारा येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा संतोष पवार (बक्कल क्र. ४३६) व महिला पोलीस कॉन्स्टेबल शेहनाज शेख (बक्कल क्र. १०४८) यांनी मार्गदर्शन केले. ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रवीण दाईगडे तसेच गोपनीय अंमलदार नवनाथ कुंभार यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून पोलिसांविषयीचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी पोलीस दल सातत्याने अशा जनजागृती उपक्रमांचे आयोजन करत असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
