प्राना फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राचीताई पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा

ढेबेवाडी विभागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप



ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
प्राना फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्राचीताई नरेंद्र पाटील यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. वाढदिवसानिमित्त ढेबेवाडी विभागातील डोंगरदऱ्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले.

यावेळी डॉ. प्राचीताई पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि अभ्यासात प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमास शुभदा पाटील, साधना कोळेकर, उज्वला पाटील, सपना पाटील, आशा सदामत, सीमा गोसावी, सुवर्णा मराठे, स्वाती उंडे, वैशाली मराठे, जयश्री पाचपुते, कमल पाटील, मालन पाटील आणि शारदा कदम यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्राना फाउंडेशनच्या माध्यमातून यादववाडी, रोडेवाडी, जौंजाळवाडी, आंबुळवाडी, शितपवाडी, मुंदुळकोळे, साबळेवाडी, जाधववाडी, पानवळवाडी, उमरकांचन, भांबुचीवाडी, सावंतवाडी, जिंती, शिंगमोडेवाडी, सुतारवाडी आणि मराठवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.