राज्यात महायुतीचा दणदणीत विजय; नाशिकात शिंदेंना धक्का

सातारा-सांगलीत महायुतीची ४० मते फुटल्याची चर्चा



मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने राज्यभर दणदणीत यश मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. बहुतांश जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय संपादन केला असून महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसला असून त्यांच्या समर्थित उमेदवार नरेंद्र दराडे यांचा भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी पराभव केला.

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अभयसिंह जगताप यांचा ३०१ मतांनी पराभव करत विजय मिळविला. या निवडणुकीत महायुतीची तब्बल ४० मते फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत यांनी ३६५ मते मिळवत विजय संपादन केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वसंत देशमुख यांना ११८ मते मिळाली, तर १६ मते बाद ठरली.

धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील यांनी ८४५ मते मिळवत काँग्रेसचे महेश देशमुख यांचा ७२१ मतांच्या फरकाने पराभव केला. या विभागात महाविकास आघाडीची सुमारे १५० मते फुटल्याचे बोलले जात आहे.

अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे पाटील यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांना ३९० मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळाले नाही.

छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाठ ४५५ मतांसह विजयी झाले. परभणीत शिवसेनेचे सईद खान विजयी झाले, तर नागपूरमध्ये भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी बाजी मारली. नांदेडमध्ये अमर राजूरकर आणि जळगावमध्ये नंदकिशोर महाजन यांनी महायुतीचा झेंडा फडकावला.

महायुतीच्या या विजयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर आगामी काळात महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.