श्री संतकृपा येथे करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या विविध संधींची माहिती मिळावी तसेच करिअर निवडीबाबत योग्य दिशा मिळावी या उद्देशाने श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NAAC Accredited), घोगांव तालुका कराड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले “करिअर मार्गदर्शन शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा” उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमास सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय तंत्रनिकेतन, कराडचे प्राचार्य तथा नोडल अधिकारी डॉ. सुरेश पाटील हे होते.
मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद बा. कुलकर्णी तसेच प्रमुख अतिथी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन कराडचे अधिव्याख्याता तथा प्रवेश प्रक्रिया समन्वयक डॉ. राम शिंदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले आज डिप्लोमा अभ्यासक्रम मराठी व इंग्रजी भाषेत शिकता येतो. महाराष्ट्रात 680 डिप्लोमा कॉलेज आहेत यामध्ये विविध कोर्सेस उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना आपल्या आवडीप्रमाणे कोर्सेसची निवड करता येते पदवीका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय, खाजगी व शासकीय सेवेत नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध होते.
प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहावीनंतर उपलब्ध असलेले विविध शैक्षणिक व व्यावसायिक पर्याय, तंत्रशिक्षणाचे वाढते महत्त्व, अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी यांची पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून कमी कालावधीत कौशल्याधारित शिक्षण घेऊन उज्ज्वल करिअर घडविता येते, असे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी व पालकांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “भविष्य बदलण्याची ताकद शिक्षणात आहे. तंत्रशिक्षण ही आजच्या काळाची गरज असून समाजातील प्रत्येक घटकाला त्याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबाचेही भविष्य उज्ज्वल घडू शकते. आज देशात आणि परदेशात कुशल तंत्रज्ञांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. डिप्लोमा शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी देशातील नामांकित कंपन्यांबरोबरच परदेशातही नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. अवघ्या १९ वर्षांच्या वयात अनेक विद्यार्थ्यांना भारतातील आघाडीच्या उद्योगसमूहांमध्ये नोकरी मिळत आहे, ही तंत्रशिक्षणाची खरी ताकद आहे.”
पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणांमध्ये अडकून न पडण्याचा सल्ला दिला. “दहावीत किती गुण मिळाले यापेक्षा त्यानंतर तुम्ही निवडलेल्या शिक्षणात किती प्रामाणिकपणे मेहनत घेता, हे अधिक महत्त्वाचे आहे. दहावीचे गुण विसरून पुढील व्यावसायिक शिक्षण मन लावून घ्या. कौशल्य विकास, औद्योगिक प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग्य शिक्षण, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रशिक्षण यांच्या बळावरच विद्यार्थ्यांचे भविष्य घडणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी इयत्ता दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन शिबिरातून करिअरविषयक अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सेजल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. भरतराज भोसले यांनी केले.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी व सचिव श्री प्रसुन्न जोहरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
