डॉ. दिलीपराव चव्हाण यांचे दुःखद निधन.
पाटण तालुक्याच्या सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात ठसा उमटवणारे व शब्दाला जागणारा नेता म्हणून सर्वत्र ओळख असणारे नेतृत्व बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मरळीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक कै. डॉ. दिलीपराव बापुराव चव्हाण (वय ७१) यांचे आज सोमवार (दि. २० एप्रिल २०२६) अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण पाटण तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
कुंभारगाव येथील वैकुंठधाममध्ये आज दुपारी १२.३० वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, युवा नेते कारखान्याचे चेअरमन यशराज (दादा) देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे पदाधिकारी, संचालक मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थित होते .
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करताना सांगितले, “डॉ. चव्हाण म्हणजे दिलेल्या शब्दाला जागणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय मानला जायचा. तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याची त्यांना अचूक माहिती होती. ते केवळ सहकारी नव्हते, तर माझे डोळे आणि कान होते.”
राजकीय चढ-उतारांच्या काळात त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या ढालीप्रमाणे निष्ठेने साथ दिल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या जाण्याने देसाई गटाच्या निष्ठावंत फौजेत मोठी पोकळी निर्माण झाल्याची खंत त्यांनी श्रद्धांजली व्यक्त करताना बोलून दाखवली
कुंभारगाव आणि ढेबेवाडी विभागाच्या राजकारणातील एक देदीप्यमान आणि निष्ठावंत पर्व आज कायमचे विसावले आहे. राजकारणातील 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे, आदरणीय व्यक्तिमत्व कै. डॉ. दिलीपराव चव्हाण यांच्या निधनाने संपूर्ण कुंभारगाव विभागावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री सातारा चे ना. शंभूराज देसाई साहेबांचे अत्यंत स्नेही आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी आयुष्यभर ज्या निष्ठेने साथ दिली, ती आजच्या काळात दुर्मिळ आहे. साहेबांच्या प्रत्येक निर्णयाला खंबीरपणे पाठिंबा देणारे आणि कुंभारगाव-ढेबेवाडी विभागात साहेबांचा विचार तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. डॉ. चव्हाण हे केवळ एक सहकारी नव्हते, तर नामदार साहेबांचे ते डोळे आणि कान होते, ज्यांच्या माहितीवर आणि अभ्यासू वृत्तीवर साहेबांचा इतका गाढा विश्वास होता की त्यांचा निर्णय हा अनेकदा साहेबांसाठी अंतिम शब्द असायचा. बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. साहेब प्रेमी म्हणून त्यांची ओळख इतकी मोठी होती की, शंभूराज साहेबांच्या राजकीय प्रवासातील प्रत्येक चढ-उतारात ते एका भक्कम ढालीसारखे उभे राहिले. विभागातील कोणतीही समस्या असो किंवा विकासाचे नियोजन, डॉ. चव्हाण यांचा शब्द नेहमीच दिशादर्शक असायचा. त्यांच्या जाण्याने केवळ चव्हाण परिवाराचेच नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघाचे आणि विशेषतः देसाई साहेबांच्या एका निष्ठावंत फौजेचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. एक संयमी, अभ्यासू आणि तितकाच परखड नेता आज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्यांनी जपलेली मूल्ये आणि त्यांची साहेबांप्रती असलेली निष्ठा कार्यकर्त्यांच्या मनात सदैव जिवंत राहील. साहेबांच्या सावलीसारखे राहणारे हे व्यक्तिमत्व आता केवळ आठवणींच्या रूपात आपल्यासोबत असेल. नियतीने एका खऱ्या साहेब प्रेमीला आपल्यातून हिरावून नेले आहे, ही भावना मनाला चटके लावून जाणारी आहे. अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.
संयमी, अभ्यासू आणि परखड नेतृत्व अशी ओळख असलेले डॉ. चव्हाण यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांनी जनमानसात विश्वास आणि आदर निर्माण केला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहिण, भावजय, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
📍 रक्षाविसर्जन: बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कुंभारगाव येथील वैकुंठधाम येथे रक्षाविसर्जन करण्यात येणार आहे.
