येळगाव (ता. कराड, जि. सातारा) येथील येळगाव फाटा परिसरातील कराड–रत्नागिरी महामार्गावर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून या ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी ग्रामपंचायत येळगाव, ग्रामस्थ तसेच शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन मा. नितीनकाका पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
कराड–रत्नागिरी हा ग्रामीण भागातून जाणारा अतिशय गतिमान व धोकादायक वळणांचा रस्ता असून येळगाव फाटा परिसरात गेल्या चार वर्षांत अनेक भीषण अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून काही जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्वही आले आहे.
याच परिसरात सुमारे २०० मीटर अंतरावर श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे संस्थापक अशोकराव भावके यांचेही अपघाती निधन झाले होते. त्यामुळे या ठिकाणच्या धोकादायक परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे. भविष्यात ग्रामस्थ, विद्यार्थी व प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी येळगाव फाटा परिसरात रम्बलर स्ट्रिप (Rumbler Strip) तसेच गतिरोधक बसविणे, इशारा फलक लावणे आणि वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या प्रसंगी येळगावचे ग्रामस्थ व माजी उपसरपंच संतोष माने, हरिदासशेठ सोरटे, नितीन सांळुखे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत संबंधित विभागाशी पाठपुरावा करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन मा. नितीनकाका पाटील यांनी दिले.
