अहमदपूर (प्रतिनिधी) : येथील युवा कवी विजय पवार यांना त्यांच्या दर्जेदार साहित्यनिर्मितीबद्दल ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दि. १४ मार्च २०२६ रोजी, शनिवारच्या दिवशी पुणे येथील आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशनच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कवी विजय पवार यांचा ‘महाराष्ट्र माझा’ हा काव्यसंग्रह विशेष गाजला असून, साध्या, सहज आणि सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत त्यांनी मांडलेले विषय वाचकांना भावतात. या काव्यसंग्रहातून शेतकरी, कष्टकरी तसेच महापुरुषांचे विचार प्रभावीपणे मांडले गेले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या कवितांची रचना इतकी सोपी आहे की लहान मुलांनाही ती सहज वाचता व समजता येते.
याशिवाय ‘कविता पावसाच्या’ या पावसावर आधारित प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे संपादन करून त्यांनी साहित्य क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या कविता इतर पाच प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमध्येही प्रकाशित झालेल्या आहेत.
कवी विजय पवार यांच्या साहित्यिक जडणघडणीत त्यांच्या आई मिराबाई गोविंद पवार, वडील गोविंदराव गणपती पवार, तसेच ज्येष्ठ साहित्यिक एन. डी. राठोड, प्रा. भगवानराव आमलापूरे आणि भारत सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
सध्या ते नांदेड येथील फार्मसी महाविद्यालयात ‘मास्टर ऑफ फार्मसी (फार्माकोलॉजी)’ या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच साहित्य क्षेत्रातही ते उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या या यशामुळे अहमदपूर परिसरासह साहित्य क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
