“श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त” शेतकरी चौकात ‘आनंद यात्रा’चे आयोजन


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: वडूज येथील शेतकरी चौकात श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने शुक्रवार, दि. २० रोजी दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी स्वामी जपाच्या नामघोषात कार्यक्रम संपन्न होणार असून तीन दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण शेतकरी चौक परिसर स्वामी नामाने भक्तिमय होणार आहे.

या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात एक दिव्य आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून स्वामी शक्तीची अनुभूती सर्व भाविकांना मिळणार आहे. वडूजमधील शेतकरी चौक हा धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेला शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक रथयात्रा, तसेच पारायण मंडळाच्या वतीने अनेक वर्षांपासून ज्ञानेश्वरी पारायण अखंडपणे आयोजित केले जाते. महादेव मंदिरातील महाशिवरात्री उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

ग्रामदैवत भैरवनाथ व जोगेश्वरी यात्रेदरम्यान देवाची पालखी शेतकरी चौक माळी वाडा येथे अनेक वर्षांपासून विसाव्यासाठी थांबते. तसेच जोतिबा चैत्र यात्रेत मानाची सासनकाठी राहुल खडके यांच्या घरासमोर थांबते. त्यामुळे शेतकरी चौकाला शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा लाभलेली आहे.

हा भक्तीचा वारसा पुढे अखंड सुरू राहावा, यासाठी शेतकरी चौकातील युवापिढी एकत्र येऊन यावर्षी ‘आनंद यात्रा’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी मंडळाला १२ वर्षे पूर्ण होत असल्याने या तपपूर्तीचे औचित्य साधून ही यात्रा भरवण्यात येणार असल्याची माहिती राहुलकुमार खडके यांनी दिली.

या यात्रेत बालगोपाळांसाठी मेवा-मिठाई, भेळ, वडापाव, जिलेबी, आईस्क्रीम, कुल्फी यांसारख्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. तसेच यात्रेचे खास आकर्षण म्हणून पाळणे, मिकिमाऊस, जंपिंग व्हील, ब्रेक डान्स कार, डान्सिंग कार, खेळणी व फुगे यांचे स्टॉलही असणार आहेत. नारळ, फुले व पूजेच्या साहित्याचे छोटे-मोठे स्टॉल लावण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे शेतकरी चौक परिसरातील व्यापारी वर्गाला रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होऊन कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. राहुलकुमार खडके यांच्या संकल्पनेतून हा पहिलाच प्रयत्न असून स्वामी समर्थांच्या कृपेने हा संकल्प निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी आनंद महाराज दुबळे, भरत फडतरे, नितीन जाधव, राहुल जाधव, डॉ. हेमंत पेठे, डॉ. करमारे, नाना कांबळे, प्रशांत कांबळे, प्रसाद जगदाळे आदी उपस्थित होते.