मालदन | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मालदन गावचे ज्येष्ठ नागरिक तथा स्वातंत्र्यसैनिक कुटुंबातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व श्री. वसंतराव पांडुरंग साळुंखे (वय ८५) यांचे मंगळवार, दिनांक ०३ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मालदन परिसरावर शोककळा पसरली असून कष्ट, त्याग आणि कुटुंबनिष्ठेचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्यसैनिक स्व. पांडुरंग नारायण साळुंखे यांचे ते थोरले सुपुत्र होत. वडिलांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेत तुरुंगवास भोगला त्या कठीण काळात घराची संपूर्ण जबाबदारी लहानग्या वसंतरावांवर येऊन पडली. अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून कामास सुरुवात केली. कोवळ्या वयात खांद्यावर आलेली जबाबदारी त्यांनी कधीही टाळली नाही; उलट कष्टाला आपले भाग्य मानून आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली.
घरची शेती सांभाळत बाहेर मजुरी करून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. वडिलांच्या पश्चात संपूर्ण कुटुंब उभे करण्याचे कार्य त्यांनी निष्ठेने पार पाडले. पुढे मुंबई येथे माथाडी कामगार म्हणून तब्बल ३० वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि साधी राहणी ही त्यांची ओळख होती.
भाऊ आणि बहिणींच्या शिक्षणासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. “स्वतः कष्ट करा पण भावंडांना शिकवा” हा त्यांचा ध्यास होता. त्यामुळे साळुंखे कुटुंबाच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, भाऊ-भावजय, सुना, पुतणे आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे द्वितीय चिरंजीव श्री. विनोद साळुंखे हे भारतातील सुप्रसिद्ध कंपनी ‘बिर्ला ओपस’मध्ये मुख्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच नवी मुंबई येथील यशस्वी उद्योजक श्री. राजेश उत्तमराव साळुंखे यांचे ते चुलते होत.
श्री. वसंतराव साळुंखे यांचा रक्षाविसर्जन कार्यक्रम गुरुवार, दिनांक ०५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता मालदन येथील स्मशानभूमीत संपन्न होणार आहे.
त्यांच्या जाण्याने कुटुंबाने आधारवड गमावला असून गावाने एक कष्टाळू, संयमी आणि मूल्यनिष्ठ ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली.
