नवी मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा.
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी; ‘नव प्रेरणा’तून नऊ कर्तृत्ववान महिलांचा गौरव.
पत्रकारितेच्या धगधगत्या प्रवासातील सोळा वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत ‘धगधगती मुंबई’ या वृत्तपत्राचा १६ वा वर्धापन दिन यंदा अत्यंत भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरा होत आहे. त्यानिमित्त शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कोपरखैरणे सेक्टर ४/५ येथील स्व. अण्णासाहेब पाटील सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व समाजाभिमुख कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान हा या सोहळ्याचा प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
‘नव प्रेरणा’तून कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान
या सोहळ्याचे खास आकर्षण ठरणार आहे ‘नव प्रेरणा’ हा विशेष उपक्रम. या अंतर्गत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. समाजातील महिलाशक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आणि त्यांच्या कार्याला योग्य दाद देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवन गौरव
पत्रकारितेतील दीर्घ व प्रभावी कारकीर्दीची दखल घेत साताऱ्याचे ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ग्रामीण ते राज्यस्तरावरील प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालवणाऱ्या जगताप यांच्या सन्मानामुळे सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभणार आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये —वनमंत्री तथा पालकमंत्री (पालघर) गणेश नाईक,सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री (लातूर) शिवेंद्रसिंहराजे भोसले,नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे,महापौर सौ. सुजाता पाटील,शिवसेना उपनेते व माजी खासदार राहुल शेवाळे,उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. भावनाताई घाणेकर,ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक महेश म्हात्रे,ठाणे जिल्ह्याचे उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,महाराष्ट्र बाजारपेठचे अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे,तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर व दिगंबर नाईक यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
वाचक-हितचिंतकांना आवाहन.
या सोहळ्यास धगधगती मुंबईचे वाचक, जाहिरातदार, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संपादक श्री भीमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप आणि धगधगती मुंबई परिवारातर्फे करण्यात आले आहे.