स्मित किरण पब्लिक स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी

गावोगावी दुमदुमली शिवगर्जना; २५ गावांत प्रेरणादायी उपक्रम



उंडाळे |कृष्णाकाठ वृत्तसेवा:  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्मित किरण  पब्लिक स्कूल, आडोंशी (ता. कराड) येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात, पारंपरिक दिमाखात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. यंदा शाळेने केवळ शालेय परिसरापुरता कार्यक्रम न ठेवता परिसरातील सुमारे २० ते २५ गावांमध्ये जाऊन शिवजयंती साजरी करण्याचा अभिनव उपक्रम राबवला.

नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेली ओजस्वी भाषणे, जोशपूर्ण पोवाडे आणि आकर्षक लेझीम सादरीकरणामुळे गावोगावी देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. लहानग्या विद्यार्थ्यांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी आत्मविश्वासाने व अभ्यासपूर्ण तयारीतून कार्यक्रम सादर केला.

आडोंशी गावात सरपंच मंगल मोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे ग्रामस्थ भारावून गेले. ओंड गावात विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषणांद्वारे स्वराज्याची प्रेरणा दिली. टाळगाव येथे लेझीमच्या दिमाखदार सादरीकरणाने वातावरण भारावून गेले, तर काढणे गावात भाषणे, पोवाडे आणि बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. सर्व ठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान, नेतृत्वगुण, संघभावना आणि सामाजिक जाणीव रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावोगावी जाऊन शिवजयंती साजरी करण्याची शाळेची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्चना शिंदे व ॲडमिन ऑफिसर महेश येडगे यांनी केले. संस्थेच्या सेक्रेटरी अंजली देसाई तसेच प्राथमिक विभाग प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, वाहतूक विभागातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

शिवरायांच्या विचारांची बीजे लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात पेरण्याचा हा प्रयत्न निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.