मालदन|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मंद्रूळकोळे पंचायत समिती गणात शिवसेनेने शुभारंभा मध्ये आघाडी घेतल्याचे चित्र उभे राहिले आहे. मालदन गावचे सुपुत्र व युवा उद्योजक नितीन दत्तात्रय काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच प्रचारालाही वेग देत विरोधकांना अक्षरशः बॅकफूटवर ढकलले आहे. धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडत काळे यांनी निवडणुकीचा ‘ओपनिंग स्ट्रोक’ मारला आहे.
सोमवारी ग्रामदैवत वडजाई मातेच्या दर्शनाने प्रचाराची सुरुवात करत नितीन काळे यांनी राजकीय ताकदीचे शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर नाईकबा येथे नाईकबा देवाचे दर्शन घेऊन शिवसेनेच्या मंद्रूळकोळे जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार मृणाल महेश पाटील व सणबुर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ.संपदा संदीप जाधव यांच्या समवेत जाहीर सभेद्वारे शिवसेनेची एकसंघ ताकद दाखवून दिली. या सभेत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमल्याने शिवसेनेचे पारडे जड होत असल्याचे संकेत मिळाले.
मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यातही सर्वांत आधी पुढाकार घेत नितीन काळे यांनी राजकीय आघाडी स्पष्ट केली आहे. तसेच कार्यकर्त्यांसाठी मतदारांसाठी निवडणूक संपर्क कार्यालयाचा ही शानदार शुभारंभ ही संपन्न झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट संपर्कही सुरू केला आहे. तर बुधवारी सायंकाळी सुतारवाडी व वडजाईनगर येथे काढलेल्या होम टू होम पदयात्रेत त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधत स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली. युवक, ज्येष्ठ व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिवसेनेच्या प्रचाराला जनाधार लाभत असल्याचे चित्र ठळक झाले आहे.
घरोघरी मिळालेला प्रतिसाद, स्वागत व जाहीर पाठिंबा पाहता निवडणुकीच्या वातावरणात खऱ्या अर्थाने रंग भरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. “आजची पदयात्रा म्हणजे विजयाची नांदीच,” अशी भावना मतदारांमधून व्यक्त होत असून मंद्रूळकोळे गणात शिवसेनेचा विजयाचा सूर लवकरच ठळक होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. पदयात्रेत शिवसेनेचे पदाधिकारी, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
