कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रॅली काढत तीनही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शक्तीप्रदर्शनात हजारो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
या रॅलीत वारुंजी जिल्हा परिषद गटासाठी सौ. सुनंदा नामदेव पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच वारुंजी पंचायत समिती गणासाठी रवींद्र बडेकर व कोयना वसाहत पंचायत समिती गणासाठी श्रीकांत पाटील यांनीही अर्ज सादर केले.
यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
ढोल-ताशांचा गजर, पक्षाच्या घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. वारुंजी गटातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी व हक्कांसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या शक्तीप्रदर्शनामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
