कुंभारगाव जिल्हा परिषद शाळेत हळदीकुंकू समारंभ व चिमुकल्यांचा रंगला ‘बालबाजार’



कुंभारगाव (ता. पाटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ व मुलींची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू समारंभ व शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा ‘बालबाजार’ शाळेच्या पटांगणात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या कार्यालयात सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर पालक महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लीना पाटील यांनी उपस्थित पालक महिला वर्ग व ग्रामस्थांना मार्गदर्शन करत शिक्षणातील पालकांची भूमिका, मुलींचे शिक्षण व संस्कार यांचे महत्त्व विशद केले.

त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा ‘बालबाजार’ भरवण्यात आला. उपक्रमशील शाळा म्हणून नावाजलेल्या या केंद्रशाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः पिकवलेला व आणलेला भाजीपाला विक्रीस ठेवला होता. शिक्षक, शिक्षिका, पालक व ग्रामस्थांनी या बाजारातून भाजीपाला खरेदी करत चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देवाण-घेवाणीचे महत्त्व, प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान, नोटा-नाणी, रुपये-पैसे यांचा वापर, वजन-मापे (किलोग्रॅममध्ये वजन करून वस्तू देणे) तसेच नफा-तोट्याची संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजली. या बालबाजारातून सुमारे ५ हजार रुपयांची उलाढाल झाली.

या उपक्रमाचे नीटनेटके नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला विकास चव्हाण, शिक्षिका अनुराधा शिवाजी आवळे, मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लीना पाटील, शिक्षक सतीश सिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेऊन हळदीकुंकू समारंभ व चिमुकल्यांचा बालबाजार यशस्वी केला.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरला असून शिक्षणासोबतच जीवन कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारा आदर्श कार्यक्रम म्हणून उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.