वडिलांच्या स्मरणार्थ पाण्यात विसर्जन टाळत शेतातच ‘रक्षा’ वापरून वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम

 


कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

कुंभारगाव (ता. पाटण) येथील जुन्या पिढीतील प्रगतशील व प्रामाणिक ज्येष्ठ शेतकरी कै. दत्तात्रय विठ्ठल देसाई यांचे दि. १६ डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांनी परंपरेला पर्यावरणपूरक दिशा देत रक्षा विसर्जनाचा एक वेगळा व आदर्श उपक्रम राबविला.

दि. १८ डिसेंबर रोजी रक्षा विसर्जनाच्या दिवशी कै. देसाई यांची रक्षा पाण्यात विसर्जित न करता, त्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केलेल्या स्वतःच्या शेतीतच वापरण्यात आली. वडिलांची चिरंतन आठवण जपण्यासाठी व निसर्गसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी देसाई कुटुंबीयांनी बेल, सुपारी, आवळा, सीताफळ व फणस अशा विविध फळझाडांची लागवड केली. या वृक्षारोपणातून वडिलांचे स्मरण तर जपलेच, शिवाय परिसरात पर्यावरणपूरक विचारांची नवी वाटही दाखवली.

या प्रसंगी मुलगा जगन्नाथ दत्तात्रय देसाई, त्यांची पत्नी सौ. संगीता जगन्नाथ देसाई, मुलगा सनी, भाऊ दिलीप दत्तात्रय देसाई व त्यांची पत्नी सौ. उज्वला दिलीप देसाई, संजय दत्तात्रय देसाई व पत्नी सौ. सुनीता संजय देसाई, मुलगा साईश, मुलगी मधुरा, चुलते राजाराम देसाई, कुंभारगाव शाळा नं. १ यांच्या मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्रमुख पाहुणे व वृक्षमित्र जालिंदर पाटील (बनपुरी) आदी उपस्थित होते.

देसाई कुटुंबीयांनी राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, पर्यावरण रक्षणाबरोबरच स्मृती जपण्याचा एक सुसंस्कृत आदर्श कुंभारगाव परिसरात निर्माण झाला आहे.