परळ | प्रतिनिधी:
सामाजिक बांधिलकी जोपासणारा आणि संवेदनशीलतेचा परिचय देणारा आगळावेगळा उपक्रम म्हणून ‘धगधगती मुंबई’ या वृत्तपत्राच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन परळ येथील श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट येथे भावनिक वातावरणात पार पडले. विशेष म्हणजे या सोहळ्यात टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
धर्मशाळा ट्रस्टमध्ये देशभरातील विविध भागांतून उपचारासाठी मुंबईत येणारे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक काही महिन्यांपर्यंत वास्तव्य करतात. या रुग्णांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचे हास्य फुलवण्यासाठी आणि त्यांच्या संघर्षमय जीवनात थोडासा दिलासा देण्यासाठी *‘धगधगती मुंबई’*च्या टीमने हा उपक्रम राबविला.
प्रकाशन सोहळ्यानंतर उपस्थित सर्व रुग्णांना दिवाळी विशेषांकाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर लाडूंचे वितरण, छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम आणि रुग्णांना थोडी आर्थिक मदत देऊन मानसिक बळ देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला. या उपक्रमामुळे धर्मशाळेचे वातावरण क्षणभर का होईना, आनंदाने उजळून निघाले.
या प्रसंगी माहीम विधानसभा निरीक्षक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) यशवंत विचले, ज्येष्ठ पत्रकार प्रा. हेमंत सामंत, ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
रुग्णांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन ही अनोखी कल्पना उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुकास्पद ठरवली. समाजातील दुर्बल घटकांना आनंदाचे क्षण देणाऱ्या या उपक्रमामुळे ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राची सामाजिक जाण आणि बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
या उपक्रमाबद्दल सामाजिक क्षेत्रासह पत्रकारिता वर्तुळातही ‘धगधगती मुंबई’च्या टीमचे विशेष अभिनंदन होत आहे.
