तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
घटस्थापनेच्या मुहूर्तावर पुजनासाठी वापरल्या जाणाऱ्या घटावर शेतीमित्र संदीप डाकवे यांनी साडेतीन शक्तीपीठे रेखाटून देवीच्या चरणी आपली सेवा रुजू केली आहे. देवीभागवतामध्ये 108 पीठांमधील देवतांचा उल्लेख आहे. यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी ऊर्फ अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणूकामाता हे तीन पीठे आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे अशी साडेतीन शक्तीपीठे आहेत. या साडेतीन शक्तीपीठांची शेतीमित्र संदीप डाकवे यांनी 10 सेमी उंच आणि 12 सेमी रुंदी असलेल्या घटावर प्रत्येकी 8 सेमी आणि 5 सेमी आकारामध्ये अप्रतिम देवीची चित्रे रेखाटली आहेत. अतिशय प्रमाणबध्द आणि आकर्षक पध्दतीने रेखाटलेली चित्रे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
संदीप डाकवे यांनी यापूर्वीही सुपारीवर महालक्ष्मी तर आपटयाच्या पानावर साडेतीन शक्तीपीठे रेखाटली आहेत. दसऱ्याचे औचित्य साधून आपटयाच्या पानाला सोनेरी रंग देवून त्यावर समाजप्रबोधनपर संदेशाचे लेखन केले होते. या अनोख्या आपटयांचे पानाचे प्रकाशन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले आहे. संदीप डाकवे यांनी राबवलेल्या या अभिनव उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले आहे.