यंगस्टार मित्र मंडळाने उचलली सामाजिक जाणिवेची मशाल



सोनवडे | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

धार्मिकतेसोबतच समाजोपयोगी कार्यालाही प्राधान्य देत यंगस्टार गणेश मंडळ, सोनवडे यांनी यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सामाजिक उपक्रमांची सुरेख सांगड घातली आहे. परंपरेप्रमाणे केवळ उत्सवापुरता कार्यक्रम न मर्यादित ठेवता समाजजागृतीचा वसा घेण्याचा निर्धार मंडळाने केला.

गणेशोत्सवाच्या काळात मंडळामार्फत नेत्र तपासणी शिबिर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, आरोग्य तपासणी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे श्री टेके आय क्लिनिक ॲन्ड मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 352 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यापैकी 70 जणांना मोफत चष्मे देण्यात आले तर 17 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच मोफत आयुष्मान भारत कार्डचेही वितरण करण्यात आले.

या नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दल मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही मोठा प्रतिसाद दिला. धार्मिकतेसोबत सामाजिकतेची जोड देत आदर्शवत उदाहरण निर्माण केल्याबद्दल यंगस्टार मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.