गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘शिवछत्रपती प्रतिष्ठान’चा शैक्षणिक उपक्रम


येळगाव |कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक वाटचालीला चालना देण्यासाठी शिवछत्रपती प्रतिष्ठान, येळगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळगाव, गवारकरवाडी व मस्करवाडी येथील पहिली ते चौथीच्या ४४ विद्यार्थ्यांना परिपूर्ण शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग, ट्रॅक सूट, टिफीन, पाण्याची बाटली, खाऊ आदींचे वाटप करण्यात आले.

तसेच नेताजी सुभाषचंद्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू १५ विद्यार्थ्यांनाही मोफत शैक्षणिक साहित्य व ट्रॅक सूट प्रदान करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना श्री. प्रशांत पाटील यांनी मांडली. प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाला सॅन्डोज मित्र परिवार, ओम साई मित्र मंडळ व सुवर्ण आशा फाऊंडेशन यांचा तसेच शिवप्रेमी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहकार्य लाभले.

या उपक्रमामुळे शिक्षणप्रेमी व स्थानिक नागरिकांकडून प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. “समाजातील गरजवंतांसाठी सतत कार्यरत राहणे हेच आमचे ध्येय असून, समाजसेवेच्या या छोट्याशा चळवळीला मोठा वटवृक्ष बनविण्यासाठी अधिकाधिक संस्था व उपक्रमशील तरुणांनी पुढे यावे,” असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.



यावेळी शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, संचालक, शिवप्रेमी ग्रामस्थ तसेच राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.