प्रतिनिधी, मुंबई (भूषण तांबे)
महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) अधिक स्पर्धात्मक बनावेत यासाठी डाक विभाग (डीओपी) आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ लिमिटेड (एमएसएसआयडीसी) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे एमएसएमईना लॉजिस्टिक्स, विपणन, ज्ञानसंपदा व बाजारपेठेतील पोहोच याबाबत मोठा फायदा होणार आहे.
ही भागीदारी ‘रेझिंग अँड अॅक्सिलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स’ (RAMP) या केंद्र शासनाच्या कार्यक्रमाशी संरेखित असून संस्थात्मक सहकार्याद्वारे महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला बळकटी देणे हा उद्देश आहे.
१७० वर्षांहून अधिक वारसा असलेल्या टपाल विभागाने देशभरातील १.६५ लाखांहून अधिक पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मेल व पार्सल सेवा, लहान बचत योजना, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI), ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI) अशा विविध सेवा पुरवणारा हा विभाग थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनांसाठी भारत सरकारचा विश्वसनीय एजंट म्हणूनही कार्य करतो.
तर, १९६२ साली स्थापन झालेली एमएसएसआयडीसी ही संस्था राज्यातील सुमारे ३० हजार लघुउद्योगांना पाठिंबा देत असून पारंपारिक हस्तकलांच्या पुनरुज्जीवनाबरोबरच प्रशिक्षण, उद्योजकता विकास, वित्तपुरवठा आणि विपणन यामध्येही आघाडीवर आहे.
या कराराअंतर्गत :
RAMP कार्यक्रमांतर्गत ज्ञान भागीदार नियुक्त होणार,
एमएसएमईसाठी लॉजिस्टिक्स आणि पोस्टल सोल्यूशन्सविषयी जागरूकता वाढवली जाणार,
परवडणारे आणि विश्वासार्ह लॉजिस्टिक सपोर्ट उपलब्ध होणार,
पोस्टल नेटवर्कचा वापर करून कारागीर, उद्योजक आणि लघुउद्योगांसाठी बाजारपेठेतील संधी वाढवल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांच्या उपस्थितीत इंडिया पोस्टचे एपीएमजी बीडी डॉ. सुधीर जाखेरे आणि एमएसएसआयडीसीच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुश्री प्रशाली जाधव दिघावकर यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी इंडिया पोस्टचे विपुल मंडलेशा, केपीएमजीचे शताब्दी कुमारी आणि रशीद रेहान सिद्दीकी उपस्थित होते.
या प्रसंगी दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले की, या सहकार्यातून एमएसएमईंच्या व्यवसायवृद्धीसाठी लॉजिस्टिक आणि ज्ञानातील तफावत भरून निघेल. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक स्थान मिळेल.
---