कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिराळा, इस्लामपूर, कोरेगाव, पाटण या व इतर भागातील मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे. हि बाब अत्यंत गंभीर असून लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहचवीणारी आहे याबाबत कराडचे प्रांताधिकारी यांना निवेदन दिले परंतु याबाबत प्रांताधिकारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. कराड दक्षिण मधील बोगस मतदानाच्या गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही आलो होतो पण प्रांतांकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले गेले नाही उलट ते भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे आम्हाला उत्तरे देत होते. बोगस मतदानाबाबत आमचा जो मूळ मुद्दा आहे कि, ज्या अधिकाऱ्यांनी हि बोगस नावे नोंदविली गेली त्यांच्यावर आणि बोगस मतदारांवर कारवाई करावी पण याबाबत चकार शब्द प्रांतांनी काढला नाही. आम्ही हि चौकशी करू, नियमात बघू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. यावेळी इंद्रजित चव्हाण, नामदेवराव पाटील, गजानन आवळकर, नितीन ढापरे, संभाजी चव्हाण, संजय तडाखे, सुरेश भोसले, देवदास माने, प्रदीप जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
बोगस मतदानाच्या प्रक्रियेबाबत वेळोवेळी आवाज उठाव करून सुद्धा प्रशासन ढम्म असल्याचे दिसून येत आहे. आम्ही या संपूर्ण प्रक्रियेवर असमाधानी असून संपूर्ण सातारा जिल्हा त्यामध्ये विशेषतः कराड दक्षिण मध्ये ज्याप्रकारे मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान नोंदणी केली गेली त्या विरोधात तीव्र आंदोलन नजीकच्या काही दिवसात करणार आहोत. असे पत्रकारांशी बोलताना भानुदास माळी यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्या आंदोलनाची किती दखल प्रशासनाने घेतली ? त्यांनी त्यांच्या गावातील बोगस मतदार पुराव्यासहित दाखविले आहेत व त्यांची मागणी आहे कि बोगस मतदारांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी त्यांचे गेली आठवडाभर आंदोलन सुरु आहे पण प्रशासनाकडून चिडीचूपची भूमिका दिसून येत आहे.