नियमभंग करणाऱ्या गणेश मंडळांवर कडक कारवाई करणार : API डॉ. प्रवीण दाईगडे यांचा इशारा.


कुंभारगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:  
गणेशोत्सव हा सर्वांचा उत्सव असून तो शांततेत व आनंदात साजरा व्हावा यासाठी सर्व गणेश मंडळांनी कायदा व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियम मोडणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईगडे यांनी दिला.

कुंभारगाव ता. पाटण येथील संस्कृती भवनात झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस स्टेशनचे गोपनीय नवनाथ कुंभार, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, सदस्य नामदेव खटावकर, विकास सावंत, अमोल गायकवाड, महादेव वरेकर, विक्रम वरेकर, प्रवीण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित गणेश मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रवीण दाईगडे म्हणाले की,

वर्गणी गोळा करताना कोणावरही जबरदस्ती होऊ नये. परवाना घेणे अनिवार्य असून तक्रार आल्यास मंडळांवर कारवाई होईल. रहदारीस अडथळा होईल असे मंडप उभारू नयेत. आरती व दर्शनाच्या वेळी महिला व मुलींच्या सुरक्षेची विशेष दक्षता घ्यावी.

गणेशमूर्तीची उंची व विसर्जन मिरवणुकीची वेळ याबाबत शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.समाजमाध्यमांवरील अफवांना बळी पडू नये.तसेच, लेझर लाईटचा वापर टाळावा, डीजे वाजवण्याऐवजी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, बॅनरबाजी टाळावी व धार्मिक तणाव निर्माण करणारे वादग्रस्त देखावे मांडू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांनी केले, तर आभार पोलीस पाटील विक्रम वरेकर यांनी मानले.