गणेश चतुर्थी निमित्त केला अनोखा देखावा ; मुंबईत गावाची हुबेहूब प्रतिकृती उभारून सर्वांचे लक्ष वेधले


तळमावले | राजेंद्र पुजारी :
गाव कुठेही असो, पण जन्मभूमीचं प्रेम मनातून कधी जात नाही! याच प्रेमातून विक्रोळी (मुंबई) येथे राहणाऱ्या गलमेवाडी (ता. पाटण) येथील सुपुत्र राहुल श्रीरंग चोरगे यांनी यंदाच्या गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या गावाची हुबेहूब प्रतिकृती उभारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

गणेश चतुर्थी प्रतिष्ठापना उत्सवानिमित्त त्यांनी आपल्या मुंबईतील घरात कार्डबोर्ड, पेपर आणि इतर साहित्याचा वापर करून अवघ्या सहा बाय अडीच फुटांच्या जागेत गलमेवाडी गावाचे वास्तव दर्शन घडवणारा देखावा साकारला. हा देखावा उभारण्यासाठी त्यांनी १५ ऑगस्टपासून तब्बल १२ दिवस रोज चार-चार तास परिश्रम घेतले.

राहुल यांचा हा प्रयत्न केवळ सजावटीपुरता मर्यादित नसून, “जन्मभूमी विसरू नये” हा संदेश देणारा आहे. गावातील घरांची मांडणी, वाडीचे स्वरूप याची त्यांनी कौशल्यपूर्ण जुळवाजुळव केली आहे.

यापूर्वीही त्यांनी चंद्रयान, विठ्ठल मूर्ती, शिवाजी महाराज पुतळा, झाडावरील पाळणा असे विविध विषयांवर आधारित देखावे साकारले होते. मात्र, यंदाचा गावाचा देखावा हा भावनिक आणि वेगळा ठरला आहे.

मुंबईतल्या या ‘लघुगावाच्या’ दर्शनाने गलमेवाडीतील ग्रामस्थ तर भारावलेच आहेत, शिवाय “गावाशी नाळ जोडून ठेवणाऱ्या या तरुणाला सलाम” अशा शब्दांत सर्वत्र कौतुक होत आहे.