पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र राज्यात प्रथमच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात उपक्रमाची सुरुवात



तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
नागरिकांच्या दारापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणींवर तातडीने उपाय शोधण्यासाठी राज्यात प्रथमच "पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी" या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन दौलतनगर येथील महाराष्ट्र लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे सात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांमध्ये डी. वाय. पाटील, पांडुरंग सुर्वे, आत्माराम सूर्यवंशी, बंडू देसाई, काशिनाथ जाधव, सुमित्रा शेळके व ताराबाई साळुंखे यांचा समावेश होता.

या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार जोशी, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार आनंद गुरव, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील गाडे, यशराज देसाई, रविराज देसाई, पालकमंत्री कार्यालयाचे समन्वयक गजानन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “पाटणसारख्या डोंगरी मतदारसंघातील नागरिकांना लहानशा कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयाची पायपीट करावी लागते. हे थांबवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी आपले प्रश्न, तक्रारी व शासकीय कामकाजातील अडचणी कागदपत्रासह समन्वयकांकडे द्याव्यात. नियुक्त टीम अर्ज भरून घेऊन त्याचा पाठपुरावा करेल आणि संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवेल. तांत्रिक अडचणी असलेल्या अर्जांवर जिल्हास्तरीय बैठकीत विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. घरबसल्या सर्व शासकीय योजनांचा लाभ देणे हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

ना. देसाई पुढे म्हणाले, “लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या विचारांवर आधारितच हे कार्य आहे. आम्हाला आमदार व मंत्रीपद जनतेच्या मतामुळे मिळाले असून जनतेशी असलेली बांधिलकी जपणे ही आमची पहिली जबाबदारी आहे. स्व. बाळासाहेब देसाई यांनी कधीही सर्वसामान्य माणसाशी असलेली नाळ तुटू दिली नाही, तीच तत्वे आपण पाळायला हवीत.”

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय शिंदे यांनी मानले. यावेळी विविध संस्था, अधिकारी, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.