ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण तालुक्यातील पवारवाडी कुठरे येथे बुधवारी रात्री झालेल्या घरफोडीत सुमारे ७ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील दिनकर कृष्णा पवार यांच्या घराच्या पाठीमागील दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घराच्या मागील खोलीत असलेल्या लोखंडी कपाटातील लॉकर फोडून त्यातील ऐवजावर डल्ला मारला.
चोरट्यांनी सुमारे ७.८२ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. यात सोन्याचे गंठण, लक्ष्मीहार, नेकलेस, चेन, बांगड्या, अंगठ्या, बुगड्या, मनी तसेच रोख रक्कम असा ऐवज समाविष्ट आहे.
या घटनेनंतर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रविण दाईगडे अधिक तपास करत आहेत.