"व्यसन म्हणजे संकट; नशा मनुष्याला उध्वस्त करते": किशोर काळोखे


सातारा|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

 “व्यसनाचा अर्थच संकट आहे. व्यसनामुळेच मनुष्य बेभान होतो. व्यसनांमुळे व्यक्ती आणि कुटुंब दोन्हीही उध्वस्त होतात,” असे परिवर्तन ट्रस्टचे प्रकल्प अधिकारी व परिचित सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर काळोखे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.

भारत नशामुक्ती अभियानांतर्गत सातारा जिल्हा कारागृहात आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक श्री. शामकांत शेडगे प्रमुख उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार तुरुंगाधिकारी श्री. निंबाळकर यांनी मानले.

श्री. काळोखे म्हणाले, “मनुष्य जेव्हा स्वतःच्या तंत्राने वागतो, तेव्हा तो लवकरच वाईट सवयींचा गुलाम बनतो. मनात तिरस्कार, द्वेष आणि हिंसा जन्माला येण्याचे मूळ कारण नकारात्मक विचार असतात. विचारच मनुष्याला बळ देतात आणि विचारच त्याला दुबळाही बनवतात. त्यामुळे खरा शत्रू म्हणजे आपले नकारात्मक विचार.”

ते पुढे म्हणाले, “दारू, तंबाखू, गांजा, अमली पदार्थ हे शरीरापेक्षा अधिक मेंदूचे नुकसान करतात. शारीरिक नुकसान भरून निघू शकते, परंतु मानसिक जखमा आणि नुकसान भरून न निघणारे असते. माणसाच्या वेदना, तळमळ आणि त्रास इतरांसोबत वाटून घेता येत नाहीत; त्यामुळे व्यसनामुळे होणारे नुकसान अपरिहार्य आणि गंभीर असते.”

व्यसनमुक्तीच्या उपायांवर बोलताना काळोखे यांनी सांगितले की, नियमित औषधोपचार आणि समूह-परामर्श यामुळे मनोधैर्य वाढविता येते. मात्र, त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणे सर्वांत महत्त्वाचे आहे.

कार्यक्रमात श्री. काळोखे यांनी “देवमाणूस” ही प्रभावी गोष्ट सादर केली. या कथेतून दिलेल्या जीवनमूल्यांनी सर्व बंदिवान मंत्रमुग्ध झाले. त्यांचे विचार ऐकून कैद्यांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.