उंब्रज/प्रतिनिधी
जाधववाडी,ता.पाटण येथील भर वस्तीत घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या जागीच ठार तर एकीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले असून बिबट्याच्या भीतीने परिसर चांगलाच हादरला आहे. वन विभागाने सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जाधववाडी येथील रहिवासी समीर रामचंद्र जाधव यांचे घराजवळ जनावरांचे शेड आहे. समीर जाधव शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी शेडमध्ये गेले असता चार पैकी तीन शेळ्या जागीच ठार झाल्याचे तसेच एक शेळी गायब झाल्याचे दिसून आले. शेड परिसरात पहाणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे जाधव कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली असून झालेले आर्थिक नुकसान न भरून येणारे आहे. तरी वन विभागाने सदर घटनेचा पंचनामा करून जाधव कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वनविभागाने सदर घटनेचा पंचनामा करून समीर जाधव यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी आमची मागणी आहे.
गणेश रामचंद्र जाधव (ग्रा.पं. सदस्य जाधववाडी)