नवी मुंबईत “यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५” सोहळा भव्यदिव्य उत्साहात संपन्न




नवी मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

नवी मुंबई, घणसोली येथे यशवंतराव चव्हाण फाउंडेशन व साप्ताहिक यशवंतनीती वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५” वितरण सोहळा काल रविवारी भव्यदिव्य उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना “यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५” देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार विक्रम पाटील होते. तसेच महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक व राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार व दिनमान चे संपादक विजय चोरमारे, महिला नेत्या रंजनाताई शिंत्रे, कविताताई कचरे,चंद्रकांत चाळके, सुभाष बावडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष व यशवंतनीती चे संपादक संजय रत्नाबाई किसन सावंत यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वीपणे व उत्साहात पार पडला.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकत, त्यांचे पहिले मुख्यमंत्री म्हणून आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीतले योगदान अधोरेखित केले. महेश म्हात्रे यांनी चव्हाण यांच्या वाचनाची आवड, त्यांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आणि फाउंडेशनच्या उपक्रमांबद्दल सविस्तर भाष्य केले.

आमदार विक्रम पाटील यांनी आपल्या भाषणात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेने व आदर्शांनी प्रेरित होऊन समाजकारणाची दिशा ठरवली असल्याचे सांगितले.

 “यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले दूरदर्शी नेते होते. त्यांच्या कार्यातून सामाजिक न्याय, शिक्षणविस्तार आणि विकास हीच खरी राजकारणाची दिशा आहे, हे शिकायला मिळते,” असे त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना त्यांनी पनवेल ही आपली कर्मभूमी असल्याचे सांगून, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना नेहमीच आपला पाठिंबा राहील, असे आश्वासन दिले. “समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीच्या प्रवाहात आणणे हेच खरी सेवा आहे, आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी केले.

नुकतीच भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळावर (मिनिस्ट्री ऑफ स्टील) स्वतंत्र संचालक व राज्यमंत्री दर्जावर नियुक्ती झाल्याबद्दल भरत नाना पाटील  यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात भरत नाना पाटील यांनी संयम, निःस्वार्थी कार्य आणि पक्षनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले.

 “राजकारणात तात्पुरत्या यशापेक्षा सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची असते. मी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून प्रवास सुरू केला आणि भारतीय जनता पक्षाने मला संधी देत राज्यमंत्री दर्जावर नेमणूक केली. हा प्रवास हेच दाखवतो की, पक्ष सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या पदापर्यंत पोहोचवतो,” असे त्यांनी सांगितले.

तसेच, त्यांनी तरुण पिढीला राजकारणात आणि सामाजिक कार्यात प्रामाणिकपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. “समाजसेवेचा मार्ग हा दीर्घकालीन आहे, त्यासाठी त्याग, प्रामाणिकपणा आणि लोकांशी जुळवून घेण्याची तयारी हवी,” असेही त्यांनी नमूद केले.

विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत, प्रेरणादायी विचार आणि गौरवाचा जल्लोष असा हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला












.