मुंबई कृष्णाकाठ वृत्तसेवा: ज्या सरकारी बंगल्यात जन्म झाला त्याच बंगल्यात कॅबिनेट मंत्री म्हणून गृहप्रवेश करण्याचे भाग्य पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी कॅबिनेट मंत्री ना. शंभूराज देसाई यांना लाभले. लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचा उज्ज्वल वारसा यशस्वीपणे जोपासणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांनी आपल्या संघर्षमय जीवनातून हे यश साध्य केल्याने आज खऱ्या अर्थाने देसाई घराण्याचा नावलौकिक संपूर्ण राज्यात पुन्हा दरवळला. 'मेघदूत' गृहप्रवेशावेळी आपल्या पुत्राच्या यशाने मॉसाहेब विजयादेवी देसाई यांना गहिवरून आले व ना. शंभूराज देसाई यांचाही अश्रूंचा बांध फुटला. मायलेकांच्या आसवात 'मेघदूत' चिंब चिंब भिजला...! ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा । त्याचा तिही लोकी झेंडा । असे प्रत्येक आईला वाटते त्याचप्रमाणे आपल्या पुत्राच्या यशाने मॉसाहेबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले..! या भावूक प्रसंगाची क्लिप व्हायरल होताच संपूर्ण पाटण तालुका गहिवरल्याचे दिसून आले.
लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई राज्याचे गृहमंत्री असताना त्यांच्या सुनबाई म्हणून माँसाहेब विजयादेवी देसाई यांनी 'मेघदूत' बंगल्यात गृहप्रवेश केला. लग्नानंतरचा सुरूवातीचा काळ त्यांनी याच बंगल्यात व्यतित केला. ना. शंभूराज देसाई यांचा जन्मही 'मेघदूत' बंगल्यातच झालेला. माँसाहेबांच्या अनेक आठवणी 'मेघदूत' बंगल्याशी जोडलेल्या आहेत. लोकनेत्यांचा सुवर्णकाळ त्यांनी या बंगल्यातूनच पाहिलेला आहे. देसाई घराणे आणि 'मेघदूत' बंगला यांचे नाते अजोड होते. अशा अनेक सुवर्ण आठवणींनी जोडल्या गेलेल्या 'मेघदूत' बंगल्यात एकदा तरी राहण्याची माँसाहेबांची अनेक वर्षांपासूनची असलेली इच्छा पूर्ण करण्याचा ना. शंभूराज देसाई यांनी दिलेला शब्द अखेर सत्यात उतरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. शंभूराज देसाई यांना 'मेघदूत' बंगला देत देसाई घराण्याचा खऱ्या अर्थाने सन्मान केला.
यावेळी बोलताना माँसाहेब विजयादेवी शिवाजीराव देसाई यांनी आपल्या 'मेघदूत' संबंधीच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, लोकनेते साहेबांनी मला मुलीप्रमाणे वागवले. माझ्या पहिल्या बाळंतपणात मला माहेरी नाशिकला न पाठवता त्यांनी मुंबईतच माझे बाळंतपण करण्याचा निर्णय घेतला. ना. शंभूराज देसाई दादाचा जन्म याच 'मेघदूत' बंगल्यात झाला. या बंगल्यानेच मला खऱ्या अर्थाने 'आई' पण दिले. हे सांगताना माँसाहेब कमालीच्या भावूक झाल्या.
ना. शंभूराज देसाई या भावूक क्षणाला कमालीचे गहिवरले. संपूर्ण वातावरण भावूक बनले होते. ते म्हणाले, मेघदूत बंगला मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती ती मुख्यमंत्र्यांनी मान्य करत मला मेघदूत बंगला दिला. आज मॉसाहेबांचा वाढदिवस आहे, त्या शुभप्रसंगी गृहप्रवेश केला. यावेळी मॉसाहेबांना गहिवरून आले. लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात मोठं काम केलं. तसेच कार्य माझ्या हातून घडावं, या माझ्या भावना आहेत. आई व वडील यांची इच्छा होती मी स्पर्धा परीक्षा द्यावी. आईची इच्छा होती मी कलेक्टर व्हावं. माझ्या वडिलांच्या आकस्मित निधनानंतर सर्व जबाबदारी माझ्यावर आली. मतदार संघातील दिग्गज नेत्यांनी आईंना विनंती करून मला राजकारणात पाठवण्यास सांगितलं. २० वर्षांचा असताना १९८६ साली मी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा बिनविरोध चेअरमन झालो.
देसाई घराण्याच्या माध्यमातून पाटण विधानसभा मतदारसंघात यानिमित्त पुन्हा एकदा सुवर्णकाळ अनुभवण्यास मिळत असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. ५५ वर्षानंतर पुन्हा एकदा 'मेघदूत' लोकनेत्यांचे नातू ना. शंभूराज देसाई यांच्याकडे आल्याने खऱ्या अर्थाने 'लोकनेते पर्व' सुरू झाल्याचा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.
'शंभूराज' आता कलेक्टरपेक्षा मोठा झाला !
माँसाहेब यांनी 'मेघदूत' गृहप्रवेशावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. शंभूराज याचा जन्म याच बंगल्यातला. मला त्याला कलेक्टर करायचं होतं. मात्र तो आज कलेक्टरपेक्षा मोठा झाला. आमदार झाला, मंत्री झाला. आम्हाला पावनगड बंगला मिळाला होता. पण मी विचारायचे मेघदूत बंगला मिळेल का. आईची इच्छा त्याने पूर्ण केली. आज त्यांचे वडील असते तर आनंद झाला असता. या बंगल्याशी संबंधीत अनेक आठवणी आहेत. घरात प्रवेश करताना पहिली आठवण लोकनेते आणि ताईसाहेबांची आली. आमच्यावेळी हा बंगला ब्रिटीशकालिन होता, असेही त्या म्हणाल्या.
आईचा पराभव जिव्हारी लागला.
याप्रसंगी प्रतिक्रिया देताना ना. शंभूराज देसाई यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. देसाई घराण्याचं नाव टिकविण्यासाठी पराभव समोर दिसत असताना आई राजकारणात उतरल्या, पराभव झाला. मात्र एक शब्द तिने काढला नाही. ज्या पाटणकरांनी माझ्या आईचा पराभव केला त्यांचा मी पराभव केला याचं समाधान आहे. ते पाटणकर आता जरी टिका करत असले तरी माझ्या वरिष्ठांनी मला श्रध्दा आणि सबुरीचा सल्ला दिला आहे, असेही ना. शंभूराज देसाई म्हणाले. लहानपणीची आठवण आईने सांगितल्यावर त्यावर देसाई म्हणाले, क्लासलिडर होण्यासाठी मी शाळेत मुलांना चॉकलेट वाटायचो. तिने ते व्यवस्थित लक्षात ठेवलं.