संघटनेचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांची माहिती
महाराष्ट्रातील मराठी माध्यमांच्या अनुदानित शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, शासनाच्या विविध निर्णयांमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या विरोधात सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक एकत्र येत शुक्रवार, दि. ११ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढणार आहेत.
या आंदोलनाचे आयोजन सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ आणि विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
मोर्चामागील प्रमुख मागण्या:
- १५ मार्च २०२४ चा संच मान्यता संबंधी शासन निर्णय रद्द करून मागील शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी.
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला मान्यता द्यावी.
- पवित्र पोर्टल रद्द करून वर्षातून किमान दोन वेळा शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी.
- १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार टप्पा वाढ त्वरित द्यावी.
सातव्या वेतन आयोगानुसार शाळांना अनुदान द्यावे.
संघटनेचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी कळविले आहे की, या दिवशी जिल्ह्यातील सर्व अनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोर्चात सक्रीय सहभाग घ्यावा, तसेच पालकांच्या संमतीने काही निवडक विद्यार्थ्यांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्चाची माहिती पुढीलप्रमाणे:
- एकत्र येण्याचे ठिकाण: गांधी मैदान, राजवाडा, सातारा
- निवेदन देण्याचे ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा
- वेळ: सकाळी १०:०० वाजता
संस्थाचालकांनी आपल्या शाळांना बंद ठेवण्याबाबत लेखी आदेश द्यावेत, तसेच शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि संचालक मंडळांनीही प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.
"या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष शाळांच्या समस्यांकडे वेधून शासन निर्णय रद्द करण्यासाठी दबाव निर्माण करणार आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.