स्मितकिरण पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
स्मितकिरण पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक दिंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग आणि भगवे ध्वज हातात घेऊन पारंपरिक पोशाखात ‘विठ्ठल-विठ्ठल’चा गजर करत शाळा परिसरात भव्य मिरवणूक काढली. या माध्यमातून वारकरी संप्रदायातील श्रद्धा, शिस्त आणि भक्तीभावाचे दर्शन घडवले.
दिंडी पूजन संस्थेच्या सचिव डॉ. अंजली देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक व सांस्कृतिक मूल्यांचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले. प्राचार्य अमोल अंबपकर आणि प्रशासक महेश येडगे यांनी दिंडीचे स्वागत करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.


कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्चना शिंदे यांनी केले होते. यामध्ये रिंगण सोहळा, फुगड्या, भक्तिगीते, हरिपाठ तसेच मर्दानी खेळांचे सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणातून संत तुकाराम, संत नामदेव यांच्या जीवनकार्याचा संदर्भ देत विठ्ठलभक्तीचे दर्शन घडवले.
गणेश लोहार यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत वातावरण अधिक रंगतदार केले, तर शुभदा देशमुख यांनी कार्यक्रमाबद्दल उपस्थितांचे आभार मानले. सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
या दिंडी उत्सवामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेची ओळख झाली, तसेच भक्ती, एकतेचा संदेश आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व पटवून देण्यात यश आले.