श्री मळाई देवी शिक्षण संस्था संचलित आ.च. विद्यालय व आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे इ. १० वी (सन २०२४-२५) मधील प्रथम पाच क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक यशवंत विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी तसेच आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे कॉलेज, कराड येथील प्रा. मा. विश्वनाथ सुतार, अध्यक्षा श्रीमती हसीना मुजावर (भरोसा सेल, पोलीस हेडकॉन्स्टेबल, कराड), तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनीषा महाडिक, शेतीमित्र मा. अशोकराव थोरात, मा. गुणवंतराव जाधव, मा. शिवाजीराव धुमाळ, मा. भास्करराव मोहिते, मा. जयवंतराव कराळे, मा. ज्ञानदेव कवळे, श्रीमती तारामती पारवे, सौ. सुजाता भावके, मा. शेखर शिर्के, मा. संजय तडाखे, मा. पी. जी. पाटील (अध्यक्ष, श्री मळाई देवी शिक्षण संस्था) तसेच संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.
मुख्याध्यापिका सौ. ए. एस. कुंभार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठावीत, असा संदेश त्यांनी दिला.
प्रमुख पाहुणे प्रा. विश्वनाथ सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलच्या योग्य वापराचे महत्त्व सांगितले. “मोबाईल हे आधुनिक ज्ञानाचे विद्यापीठ आहे, परंतु त्याचा सकारात्मक वापरच फायदेशीर ठरतो,” असे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका, लाजू नका आणि यशवंत होण्याचा सतत प्रयत्न करा, असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती हसीना मुजावर यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. “मैत्री ही समजून, विचारपूर्वक केली पाहिजे. संस्कारांमुळेच संस्कृती वृद्धिंगत होते. ज्येष्ठांचा मान राखा आणि यशस्वी आयुष्य जगा,” असा संदेश त्यांनी दिला.
श्री. अशोकराव थोरात (शेतीमित्र, सचिव – श्री मळाई देवी शिक्षण संस्था) यांनीही विद्यार्थ्यांना ध्येय, आत्मविश्वास आणि सातत्याचे महत्त्व पटवून देत यशस्वी जीवनाचे मंत्र दिले.
कार्यक्रमात सर्व गुणवंत, यशवंत व स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबकपणे पार पडले. पर्यवेक्षक श्री. बी. जी. बुरुंगले यांनी उपस्थित मान्यवरांचे व उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले.
या समारंभास अनेक मान्यवर, समाजसेवक, दानशूर पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नवी प्रेरणा आणि ऊर्जेचा संचार करणारा ठरला.