तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: अक्षरगणेशाकार संदीप डाकवे हे आषाढी वारीच्या निमित्ताने काही वर्षापासून कलात्मक उपक्रम राबवत आहेत. यंदा त्यांनी प्रथमच अक्षर वारी उपक्रम साकारला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखींचे प्रस्थान झाल्यापासून दररोज कॅलिग्राफीतून अभंगाच्या ओळी साकारल्या होत्या. त्या उपक्रमाची दखल प्रिंट आणि इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी घेतली आहे.
शुक्रवार दि.4 जुलै, 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता ‘भेटी लागी जीवा’ या कार्यक्रमात चित्रकार संदीप डाकवे यांनी शब्दातून विठूरायाची साकारलेली प्रतिकृती लाईव्ह स्वरुपात प्रक्षेपित करण्यात आली. वाखरी पंढरपूर येथील माऊलींच्या तिसऱ्या उभ्या रिंगण सोहळयापूर्वी हा कार्यक्रम रंगला. न्यूज 18 लोकमत चे व्हिडीओ जर्नालिस्ट प्रविण शेट्टी, कॅमेरामन सुरेश जाधव यांनी अतिशय सुंदरपणे त्याचे चित्रीकरण केले. त्याला न्यूज 18 लोकमत वाहिनी चे विशाल परदेशी आणि इतर कार्यालयीन टीम ने अतिशय सुंदर कव्हरेज देत ते लाखो लोकांपर्यंत पोहोचवले. याप्रसंगी डाकवे यांच्यासमवेत विजय मोहिते, प्रशांत अडसर, विजय सवादेकर, शांताराम ताईगडे, वैभव नष्टे, लोकेश माटेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
तसेच शनिवार दि.28 जून, 2025 रोजी एबीपी माझा वाहिनीचे सातारा प्रतिनिधी वैभव बोडके यांनी ‘माझा विठ्ठल माझी वारी’ कार्यक्रमात अक्षरवारी उपक्रमाची माहिती पाठवून ती प्रसारित केली. एबीपी माझा च्या कार्यालयीन टीम ने अतिशय सुंदर कव्हरेज देत ते अनेक दर्शकांपर्यंत पोहोचवले. या दोन्ही विशेष कार्यक्रमामुळे अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांची अक्षरवारी संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचली.
माऊलींच्या कृपेमुळे माझी कला न्यूज 18 लोकमत, एबीपी माझा आणि अन्य वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एकाचवेळी पोहोचली याचा विशेष आनंद होत आहे. या बातम्यांमुळे वर्षभर जोमाने काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आहे. न्यूज 18 लोकमत, एबीपी माझा, प्रिंट मीडिया आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मी मनापासून आभार मानतो. अशा शब्दात चित्रकार संदीप डाकवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी यापूर्वी मोरपीसावर संत तुकाराम, टी शर्ट वर विठूरायाचे चित्र, शब्दातून विठ्ठलाचे चित्र, पोस्टरमधून शुभेच्छा, भिंतीवर वारीचे चित्र, अक्षर अभंग वारी उपक्रम, न अनुभवलेली वारी हस्तलिखित, एका पानावर हरिपाठ, अभंग चित्र वारी उपक्रम, तुळस पानावर विठ्ठल, वारकरी पंचावर संत तुकाराम, अक्षर चित्र वारी उपक्रम, तुळस पानावर संत तुकाराम इ.तयार करत आपली सेवा विठूरायाच्या चरणी अर्पण केली आहे. यंदापासून ते प्रतिवर्षी अक्षर वारी ही संकल्पना आषाढी एकादशी निमित्त राबवणार आहेत. वाखरी (पंढरपूर) येथील उभ्या रिंगणाचा अमृतमय क्षण बघितल्यामुळे अशा पध्दतीचे वारीच्या निमित्ताने काहीतरी करावे, अशी प्रेरणा मिळाल्याचे संदीप डाकवे यांनी सांगितले.
अक्षर वारी उपक्रम राबवताना संदीप डाकवे यांना शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अँड.जनार्दन बोत्रे, प्रा.ए.बी.कणसे, बाळासाहेब कचरे, आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, चि.स्पंदन डाकवे, कु.सांची डाकवे यांचे विशेष सहकार्य मिळते.
एबीपी माझा या वृत्त वाहिनीवरील वृत्त पाहून सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि माजी खा.श्रीनिवास पाटील यांनी संदीप डाकवे यांच्या मोबाईलवर संपर्क साधून कलेला उत्सफुर्त दाद दिली. ‘‘हॅलो मी श्रीनिवास पाटील बोलतोय...अभिनंदन तुमचं...! आज सकाळी टीव्हीवरती बघितलं चित्र काढताना दाखवलं होतं. खूप अभिमान वाटला आम्हाला, आमच्या भागातला एक माणूस उत्तमपैकी कलाकार आहे. आनंद झाला. शाब्बास...! नमस्कार’’ अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.