रानभाजी प्रदर्शनात स्थानिक वनसंपदेला नवे महत्त्व एन. एस. कुंभार


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे २३ जुलै - जागतिक वन संवर्धन दिना निमित्ताने रानभाजी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक ज्ञान, पर्यावरणपूरक आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे प्रदर्शन विशेष लक्षवेधी ठरले.

या प्रदर्शनात कुर्डू, टाकळा, कार्टुली, माठ, शेवगा, भोपळा, भेंडी यासह ५० हून अधिक रानभाज्यांचे प्रत्यक्ष नमुने सादर करण्यात आले होते. प्रत्येक भाजीसोबत तिची ओळख, औषधी गुणधर्म, पाककृती व आहारातील स्थान याविषयी माहिती फलक लावण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन वनविभागाचे प्रकल्प अधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एन. एस. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. एस. एस. कुंभार सर यांनी ग्रामीण भागातील पारंपरिक ज्ञानाचे संवर्धन व रानभाज्यांच्या पुनरुज्जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले. “रानभाज्या केवळ चविष्ट नाहीत, तर पोषणमूल्यांनी भरलेल्या आहेत,” असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

हे प्रदर्शन राष्ट्रीय हरित सेना व शालेय विज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

या उपक्रमाला गोकुळ-धावडे परिसरातील ग्रामस्थ, पालक, आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

रानभाज्यांचे महत्त्व नव्याने अधोरेखित करणारा व पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आदर्श ठरलेला हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला.