हर्षवर्धन सावंत आणि वैष्णवी पांढरपट्टे ठरले ‘बालवैज्ञानिक’; होमी भाभा स्पर्धेत मिळवले यश
मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
श्री मळाई देवी शिक्षण संस्था संचलित आ.च. विद्यालय, मलकापूर येथील हर्षवर्धन राम सावंत (इ. ६ वी) आणि वैष्णवी राजेंद्र पांढरपट्टे (इ. ९ वी) या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. उत्तम गुण मिळवत त्यांनी ही स्पर्धा उत्तीर्ण करून विद्यालयाच्या उज्ज्वल इतिहासात नव्या यशाची भर घातली आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांनी श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचा गौरव केला. 

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. 21 व्या शतकातील स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या यशाचे गमक सांगताना वैष्णवी पांढरपट्टे म्हणाली, “प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर यश मिळवता येते. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे.”

कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. ए. कुंभार, उपमुख्याध्यापक ए. बी. थोरात, पर्यवेक्षक बी. जी. बुरुंगले, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक भरत बुरुंगले यांनी केले.