रोटरी क्लब ऑफ कराडचा 69 वा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडणार
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
समाजसेवेत 68 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या रोटरी क्लब ऑफ कराडच्या 69 व्या पदग्रहण समारंभाचे आयोजन शनिवार, दिनांक 5 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत अर्बन शताब्दी हॉल, कराड येथे करण्यात आले आहे.

2025-26 या रोटरी वर्षासाठी नूतन अध्यक्षपदाची धुरा रो. डॉ. शेखर कोगनूळकर (भूलतज्ञ, कराड) सांभाळणार असून, सचिवपदाची जबाबदारी विनायक राऊत (प्रिंटिंग व्यावसायिक) स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमाला पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर (भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते व माजी सैनिक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच रोटरी असिस्टंट गव्हर्नर 2025-26 रो. डॉ. नरेंद्र शेलार यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ कराड आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीच्या नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळाही संपन्न होईल. कराड मधील सर्व मानद सदस्य, मान्यवर नागरिक आणि रोटरी कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांची प्रकट मुलाखत रो. डॉ. सविता मोहिते घेणार आहेत. 1972 मधील पॅरा ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीपासून ते जागतिक क्रीडा क्षेत्रातील त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवास या मुलाखतीतून उलगडला जाणार आहे.

रोटरी क्लब ऑफ कराडचे नूतन अध्यक्ष रो. डॉ. शेखर कोगनूळकर यांनी रोटरी परिवारासह कराडकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.