घोगाव : रानडुकरांच्या हल्ल्यात 20 गुंठे उसाचे नुकसान

शेतकऱ्यांची नुकसानभरपाई व रानडुकरांच्या बंदोबस्ताची मागणी



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कराड तालुक्यातील घोगाव संभाजीनगर येथील कुंभारकी शिवारातील शेतकरी तानाजी राजाराम शेवाळे यांना रानटी डुकरांच्या उपद्रवामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या शेतातील सुमारे 20 गुंठे क्षेत्रावरील उसाचे पिक रानडुकरांनी फस्त केले आहे. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतकरी तानाजी शेवाळे यांनी यासंदर्भात सांगितले की, “गेल्या काही महिन्यांपासून रानडुकरांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस पिकांचे होणारे नुकसान या मुळे शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट ओढवत आहे. आम्ही शेतकरी रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेती करतो आणि रानडुकरांच्या उपद्रवामुळे आमचे संपूर्ण परिश्रम वाया जाते.”

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. रानडुकरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांनी वनविभागाला रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची आणि संरक्षणात्मक उपाययोजना त्वरित राबविण्याची विनंती केली आहे.

तसेच, झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी तानाजी शेवाळे यांनी केली आहे.