अक्षर गणेशाकार संदीप डाकवे कॅलीग्राफीतून साकारणार अक्षर वारी


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
संतवचनाप्रमाणे सुखाचा सोहळा म्हणजे पंढरपूर वारी. वारी म्हणजे अनेक गोष्टींचा मिलाफ. वारीत अनेक कलावंत आपली कला सादर करीत असतात. आणि वारकऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. असाच एक अक्षर गणेशाकार आषाढी वारीच्या निमित्ताने सन 2015 पासून कलात्मक उपक्रम राबवत आहेत. अक्षर वारी उपक्रम साकारण्याचा प्रयत्न करत आहेत पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर गणेशाकार संदीप डाकवे.

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालखींचे प्रस्थान झाल्यापासून दररोज वारीच्या अनुषंगाने कॅलिग्राफीतून अभंगाच्या ओळी साकारणार आहेत. या उपक्रमाचे वारकरी स्वागत करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पालखी प्रस्थानापासून आषाढी एकादशीपर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरु राहणार आहे. अक्षर वारकरी म्हणून विठ्ठलाच्या चरणी अक्षरगणेशाकार संदीप डाकवे हे आपली कला अर्पण करत आहेत.

संत सोयराबाई यांची ‘‘अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ।। मी तू पण गेले वाया । पाहता पंढरीच्या राया ।।’’ अशी रचना असलेल्या या अभंगातून विठ्ठलाच्या रंगांचे महात्म्य सांगितले आहे. परंतू, या अभंगाचा फक्त अर्थ समजून घेवून तो चित्रात मांडण्याचा प्रयत्न संदीप डाकवे यांनी केला आहे.

अक्षर वारी उपक्रम राबवताना संदीप डाकवे यांना शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अँड.जनार्दन बोत्रे, प्रा.ए.बी.कणसे, बाळासाहेब कचरे, आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, चि.स्पंदन डाकवे, कु.सांची डाकवे यांचे विशेष सहकार्य मिळते.

प्रतिवर्षी पंढरपूर वाखरी येथील उभ्या रिंगणाचा अमृतमय क्षण बघितल्यामुळे अशा पध्दतीचे वारीवर काहीतरी करावे, अशी प्रेरणा मिळाल्याचे संदीप डाकवे यांनी सांगितले. दररोज लिहलेल्या या अभंगामुळे भक्तीमय वातावरण निर्माण होत आहे.

वारीच्या अनुषंगाने राबवलेले कलात्मक उपक्रम :

अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी यापूर्वी मोरपीसावर संत तुकाराम, टी शर्ट वर विठूरायाचे चित्र, शब्दातून विठ्ठलाचे चित्र, पोस्टरमधून शुभेच्छा, भिंतीवर वारीचे चित्र, अक्षर अभंग वारी उपक्रम, न अनुभवलेली वारी हस्तलिखित, एका पानावर हरिपाठ, अभंग चित्र वारी उपक्रम, तुळस पानावर विठ्ठल, वारकरी पंचावर संत तुकाराम, अक्षर चित्र वारी उपक्रम, तुळस पानावर संत तुकाराम असे विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत.