३ विद्यमान व १ माजी सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गटात) प्रवेश
ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी पाटण तालुक्यात शक्तीप्रदर्शनाचे संकेत
पाटण तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, पाटणकर गटाचे तीन विद्यमान सदस्य आणि एक माजी सदस्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. नुकताच हा प्रवेश सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात पार पडला.
या वेळी राज्यसभेचे खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांच्या उपस्थितीत तसेच माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय देसाई यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये विद्यमान सदस्य किशोर चव्हाण, वैशाली गुरव, शितल गुरव तसेच माजी सदस्य संजय गुरव यांचा समावेश आहे. यांच्यासोबत अनिल काळुगडे यांचाही पक्षप्रवेश झाला.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय देसाई यांनी सांगितले की, “सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) संघटना बळकट करण्याचा आमचा संकल्प आहे. कुंभारगाव ग्रामपंचायतीची मुदत आगामी सहा महिन्यांत संपत असून, निवडणुकीत पक्ष सत्तेवर येण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू आहे.”
सध्याचे ग्रामपंचायत बलाबल – एक नजर
भाजप – १ (सरपंच सौ. सारिका पाटणकर)
राष्ट्रीय काँग्रेस – २ (उपसरपंच राजेंद्र चव्हाण, विमल शिबे)
शिंदे गट शिवसेना – २ (धनाजी बोरगे, प्रेमीला घाडगे)
अजित पवार गट (नवीन) – ४
तटस्थ – २
कुंभारगाव ग्रामपंचायत निवडणुकीस अजून सहा महिने असले तरी गावात निवडणूकपूर्व राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढणार हे निश्चित!