अक्षरगणेशाकार संदीप डाकवे आषाढी वारीच्या निमित्ताने सन 2015 पासून कलात्मक उपक्रम राबवत आहेत. यंदा ते अक्षर वारी उपक्रम साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालखींचे प्रस्थान झाल्यापासून दररोज कॅलिग्राफीतून अभंगाच्या ओळी साकारत अक्षर वारकरी म्हणून विठ्ठलाच्या चरणी अक्षरगणेशाकार संदीप डाकवे आपली कला अर्पण करत आहेत. या उपक्रमाची दखल प्रिंट आणि इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी घेतली आहे.
सदर चित्र पाहून सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि माजी खा.श्रीनिवास पाटील यांनी संदीप डाकवे यांच्या मोबाईलवर संपर्क साधून कलेला उत्सफुर्त दाद दिली. ‘‘हॅलो मी श्रीनिवास पाटील बोलतोय...अभिनंदन तुमचं...! आज सकाळी टीव्हीवरती बघितलं चित्र काढताना दाखवलं होतं. खूप अभिमान वाटला आम्हाला, आमच्या भागातला एक माणूस उत्तमपैकी कलाकार आहे. आनंद झाला. शाब्बास...! नमस्कार’’ अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
श्रीनिवास पाटील हे साहित्य आणि कलेची जाण असणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी केलेल्या कौतुकामुळे संदीप डाकवे भारावून गेले आहेत. यापूर्वीही श्रीनिवास पाटील यांनी संदीप डाकवे यांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले आहे. ‘‘कलेला मान्यवरांकडून मिळालेली दाद खूप महत्त्वाची असते, त्यामुळे आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते’’ अशा शब्दात चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.