ढेबेवाडी विभागात एसटी बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले; प्रवाशांत तीव्र संताप


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ढेबेवाडी विभागात एसटी महामंडळाच्या बस बंद पडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले असून,काल बुधवार दि. 19 जून रोजी दोन बस अचानक रस्त्यावर बंद पडल्याने प्रवाशांना तासन्‌तास अडकून राहावे लागले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, एसटी प्रशासनावर जोरदार टीका होत आहे.

काल दि. १९ जून रोजी सकाळच्या सुमारास कराड-गुढे मार्गावर धावणारी एक एसटी बस गुढे गावाजवळ अचानक बंद पडली. काही वेळाने दुसरी बस कराड-ढेबेवाडी मार्गावर, मुख्य रस्त्यावरच बंद पडल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही बस बंद पडल्यामुळे प्रवासी काही तास अडकून पडले. यामध्ये शालेय विद्यार्थी, महिला, नोकरदार वर्ग यांचा समावेश होता.



प्रशासनाकडून दुर्लक्ष?

या वाढत्या घटनांबाबत एसटी प्रशासनाने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. डिपोतील यंत्रणा अकार्यक्षम झाली आहे का? की दुर्लक्ष होत आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन बसगाड्यांची तपासणी, देखभाल व पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

______________________________

"सतत या मार्गावर बस बंद पडतात हे अत्यंत गंभीर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित आहे. डेपो प्रशासनाने वेळेवर आणि योग्य प्रकारे वाहनांची तपासणी व देखभाल करणे अत्यावश्यक आहे. जर ही जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर अशा नादुरुस्त बसेस रस्त्यावर न आणणं हेच योग्य ठरेल. प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये!"

- राहुल शेंडगे

______________________________