पाटण तालुक्यातील जानुगडेवाडी गावाच्या हद्दीत आज सकाळी पाटण आगाराची एस.टी. बस (MH 14 BT 1127) झाडावर आदळल्याने मोठा अपघात घडला. या दुर्घटनेत एकूण ३० प्रवासी जखमी झाले असून, यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह महिलांचा मोठा सहभाग आहे. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उर्वरित जखमींवर ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची घटना कशी घडली?
सळवे येथून पाटणकडे निघालेल्या बससमोर अचानक खासगी ट्रॅव्हल्स बस आली. ती वाचवताना बस चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. ही घटना जानुगडेवाडीजवळील एका धोकादायक वळणावर घडली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.
जखमींमध्ये चालक आरिफ निजाम मुल्ला (वय-५७ रा. कोळे), वाहक आर. एम. काळे (५७ रा.मालदन), सरिता धनाजी जाधव (वय ५३) सीताबाई नायकु मगरे (६१) रंजना सुरेश मगरे (५८) बाळाबाई शिवाजी मगरे (५८) शोभा भगवान मगरे (५०) निर्मला अशोक मगरे (४२) शोभा परशुराम जाधव (६५) शारदा सोनवणे (५०) छाया तानाजी जाधव (४४) धनाजी अंतू जाधव (५८, सर्व रा. सणबूर ता.पाटण), तुकाराम ज्ञानू भाईगडे (५९), तुकाराम गणपती यादव (५०), संपत हणमंत पुजारी (५०), शारदा सुरेश परीट (५०), यश जालिंदर बोरगे (१७) रोहिणी राजाराम गुरव (सर्व रा. सळवे), जिजाबाई जयसिंग चोरगे (७०), सुमन वसंत चोरगे (६०, सर्व रा. शिंदेवाडी),कमल शिवाजी जगदाळे (६०), बाळू नाना साळुंखे (५६), पल्लवी सुमित पवार (२६), सीताबाई वसंत लोहार (५०), श्रावणी सतीश पाटील (१५), आराध्या सतीश पाटील (१३), प्रगती रवींद्र पाटील (१५), समर्थ विक्रम जगदाळे (१९, सर्व रा. बनपुरी) मालन बाळासो साळुंखे (६४), जया बाळासाहेब साळुंखे (६८ सर्व रा. महिंद) इत्यादींसह अनेक प्रवासी आहेत.
गंभीर जखमींपैकी निर्मला अशोक मगरे, पल्लवी अमित पवार, आणि संभाजी सिताराम कुंभार यांना पुढील उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तात्काळ उपचार सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांच्या विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलला भेट देऊन उपचाराची पाहणी केली. डॉक्टरांशी चर्चा करून योग्य ते निर्देश देण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक विजय पाटील, सर्कल अधिकारी, तसेच वाहतूक विभागाच्या ज्योती गायकवाड यांनी ढेबेवाडी आणि कराड येथे जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. जिल्हाधिकारी संतोष पाटील हेही या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.