राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या दिवशीच भाजपने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा झटका दिला आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्याचे माजी आमदार आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सत्यजीत पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
पक्षप्रवेशावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, "पाटणकर माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. त्यांचा पक्षात प्रवेश स्वागतार्ह आहे. अनेक वर्ष सत्तेचे केंद्रीकरण झालं होतं. फक्त बालेकिल्ला म्हणत लोकांना विकासापासून दूर ठेवलं गेलं. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला झाला आहे."
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना मिश्कील शैलीत म्हणाले, "बच्चू, बच्चू म्हणून डच्चू देऊन बाजूला सारू नका म्हणजे झालं!" त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांत हास्यकल्लोळ झाला.
भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, "सत्यजीत पाटणकर हे हाडामासाचे खरे कार्यकर्ते आहेत. त्यांचा पक्षप्रवेश म्हणजे भाजपसाठी मोठं बळ आहे. भाजप हा सरकारच्या योजना प्रामाणिकपणे राबवणारा पक्ष आहे. त्यांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरेल."
पाटणकर म्हणाले, "तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. शिस्तीचा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिलं जातं. वेळ कमी आहे, निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे गावागावात जाऊन पक्षाचं काम सुरू करणार आहे."
या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थक कुंभारगावच्या सरपंच सारिका योगेश पाटणकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.