श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचा 52 वा वर्धापन दिन संपन्न.


मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
 श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचा 52 वा वर्धापन दिन श्री मळाई दिनदर्शिका प्रकाशन आ.च.विद्यालय व आदर्श ज्युनिअर कॉलेज मलकापूर येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे संस्थापक ब्रम्हीभूत गंगाधर वासुदेव चैतन्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव मा श्री अशोकराव थोरात यांनी केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, मलकापूर पंचक्रोशीतील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी गंगाधर चैतन्य महाराज यांनी मळाई देवी शिक्षण संस्थेची 18 जून 1973 रोजी स्थापना केली.आज या संस्थेची दोन उच्च माध्यमिक विद्यालये, पाच माध्यमिक विद्यालये,दोन प्राथमिक विद्यालये व एक इंग्लिश मीडियम स्कूल असा विस्तार झालेला आहे.या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करून सुसंस्कार नागरिक घडवण्याचे काम केले जाते. मलकापूर पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर कार्यरत असलेले दिसून येतात.त्यामुळे ग्रामीण भागात शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासणारी ही संस्था म्हणून ओळखण्यात येते. 

       या कार्यक्रमासाठी प्राचार्या सौ. ए.एस.कुंभार, उपमुख्याध्यापक श्री.ए.बी.थोरात, पर्यवेक्षक श्री भरत बुरुंगले, विभाग प्रमुख सौ. एस.डी. पाटील, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. वर्धापन दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.डी.खंडागळे, श्री शरद तांबवेकर यांनी केले तर आभार श्री भरत बुरूंगले यांनी मानले.