राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संचालकपदी भरत पाटील
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते ऍड. भरत (नाना) पाटील यांची भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या (NMDC) संचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती "मिनिस्ट्री ऑफ स्टील" (भारत सरकार) अंतर्गत करण्यात आली असून, त्यांना राज्यमंत्री दर्जा प्राप्त झाला आहे.
भरत पाटील हे गेली तीन दशके भाजपामध्ये कार्यरत असून त्यांनी सातारा जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या अथक मेहनतीचे आणि पक्षनिष्ठेचे हे फलित आहे. त्यांनी राजस्थान, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पक्षनिरीक्षक म्हणून कार्य केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विविध ठिकाणी चांगले यश मिळवले आहे.
या नियुक्तीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
30 वर्षांच्या संघर्षाला मिळालेले यश – नानांचे सर्वत्र कौतुक
भाजपामधील निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळालेला हा सन्मान म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा गौरव आहे. जिल्हाभरात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, "लाल दिवा" लाभलेल्या भरत पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.